अध्यक्षीय मनोगत

प्रा. पी. सी. झपके,
अध्यक्ष, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला.

         खरे म्हटले तर कोणत्याही कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय मनोगत हे शेवटी असते परंतु सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वेबसाईटचे अनावरण करत असताना मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे.

         माझे वडील कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या विवाहानंतर त्यांना झालेली पहिली दोन अपत्ये (कु. निर्मलप्रभा, कु. उज्वलप्रभा) लहानपणीच निर्वतल्यानंतर कै. बापूंनी ३ मार्च १९५२ रोजी सां. ता. शि. प्र. मंडळ व सांगोला विद्यामंदिर या अपत्यांना जन्म दिला. ही अपत्ये म्हणण्याचे कारण आम्हां बहीण भावापेक्षा या अपत्यांवर त्यांनी जीवापाड प्रेम करुनही अपत्ये केवळ जगवीली नव्हेत तर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये काबाड कष्ट करुन ही अपत्ये नावारुपास आणली.
         अलिकडील काळात शैक्षणिक संस्था रजिस्टर करुन व काही प्रयोग करुन शासनाकडून बिगर अनुदान तत्वावरती शाळा मिळवून अनेक शाळा सुरु करणाच्या ‘शिक्षण महर्षीची’ एक लाटच निर्माण झाली आहे. परंतु ६६ वर्षापूर्वी सांगोले सारख्या ग्रामीण व दुष्काळी भागामध्ये शाळा काढणे आणि ती चांगल्या रीतीने चालविणे हे एक आव्हानच होते परंतु कै. वि. ए. उर्फ आण्णासो झपके (माझे आजोबा) व कै. भि. बा. उर्फ आण्णासाहेब चव्हाण (माझ्या आजोबांचे धंद्यातील भागीदार) या दोघांच्या प्रचंड नैतिक पाठबळामुळे व त्यांनी त्याकाळी सुरुवातीला दिलेल्या अल्पशा परंतु अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या आर्थिक पाठबळामुळे कै. बापूंनी ही शैक्षणिक संस्था आणि शाळा सुरु करण्याचा धाडसी प्रयत्न केला. सुरुवातीस कै. मा. सा. माळी (तत्कालीन सेक्रेटरी) त्याचप्रमाणे कै.राजाभाऊ झपके, कै. शि. ज्ञा.घोंगडे,कै. मा. ज. घोंगडे या सर्व जुन्या काळातील शिक्षकांनी त्याचप्रमाणे कै. डॉ. व्यं. शि. उर्फ दादासो केळकर, कै. म. शं. उर्फ भाई ढोले (कमलापूर), कै. स. नि. उर्फ आण्णासो चांदणे (एखतपूर) इत्यादी सुरुवातीच्या संस्था सदस्यांनी मनापासून केलेल्या सहकार्यामुळे आज संस्था आणि शाळा यांचा वाढलेला व्याप व नावलौकीक प्राप्त झालेला आहे.

         कै. बापूंनी केवळ सांगोला शहराचा विचार न करता तालुक्यामध्ये कोळा, नाझरा, घेरडी, जवळा, लक्ष्मी दहीवडी, एखतपूर इत्यादी ठिकाणी तेथील गावक-यांच्या सहकार्याने माध्यमिक शाळांना सुरुवात केली. अलीकडच्या काळात ज्या शैक्षणिक संस्थांचा शाळा विस्तार जास्त तेवढी ती संस्था मोठी ही संकल्पना त्या काळीही अस्तित्वात असताना सुध्दा त्या त्या गावामधील काही प्रमुख नागरिकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्यास प्रवृत्त करुन त्या त्या गावच्या शाळा स्थानिक शैक्षणिक संस्थांच्या ताब्यात दिल्या आज केवळ नाझरा व कोळा व सांगोला या ठिकाणी संस्थेच्या मालकीच्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय आहेत.
         कै. बापू पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना महात्मा गांधींच्या 'चले जाव आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतल्याने त्यांना एक वर्षाहून अधिक काळ कारावासाची शिक्षा झाली. कै. बापूंच्या जीवनात ही कारावासाची शिक्षा अत्यंत महत्वपूर्ण व जीवनाला कलाटणी देणारी ठरली थोर स्वातंत्र्य सेनानी आचार्य भागवत, दादा धर्माधिकारी, चितळे मामा, साने गुरुजी, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ, एस. एम. जोशी, नानासो गोरे, ग. प्र. प्रधान यासारख्या गांधीवादी विचारवंतांचा सहवास त्यांना कारावासात असताना मिळाला.तिथे तयार झालेला आणि मनावर बिंबवला गेलेला 'गांधीवाद' त्यांनी मरेपर्यंत वकीली व्यवसायामध्ये व शैक्षणिक संस्था चालविताना अंगीकारला. त्यामुळे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेकडे काहीशा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. कै. बापूंच्या निधनानंतर मातोश्री कै. बाईसाहेबांनी, कै.बाईसाहेबांच्या मृत्यूनंतर मी हा ‘वेगळा दृष्टीकोन’ जपण्याचा कसोशिने यशस्वी प्रयत्न करीत आहे. अर्थात हा वेगळेपणा जपण्यासाठी हयातभर कै. मा. सा. माळी त्याचप्रमाणे कै. राजाभाऊ झपके, कै. शि. ज्ञा. घोंगडे, कै . मा. ज. घोंगडे, श्री. अंकलगी, कै. होनराव, श्री. शं. बा. सावंत, श्री. म. शं. घोंगडे, श्री. दि. धों. जगताप, श्री. म. ज. तोडकरी, अॅड. विजयसिंह चव्हाण, त्याचप्रमाणे श्री. म. वि. घोंगडे, श्री. व. दि. पुजारी व माझे घरातील श्री. प्रफुल्लचंद्र, श्री. प्रशुध्दचंद्र, श्रीमती. मंगलप्रभा कोरी, सौ. शीला, सौ. राजश्री, सौ. अंजली, श्री.विश्वेश, श्री.प्रसाद या सर्वांचेच सहकार्य व योगदान अत्यंत महत्वाचे ठरत आहे.
          कै. बापूंना 'वशिला' आणि तोही राजकीय ‘वशिला' लावणे हे अजिबात मान्य नव्हेत माझ्या माहितीप्रमाणे कै. बापूंनी केवळ दोनच वेळी राजकीय वशिला लावला त्यापैकी एक म्हणजे कै. भाऊसो हिरे महसुल मंत्री असताना सध्या संस्थेच्या मालकीची असलेली सांगोला विद्यामंदिर प्रशालेची दोन एकर बावीस गुंठे जागा महाराष्ट्र शासनाकडून मिळविण्यासाठी आणि दुसरा म्हणजे मा. वसंतराव दादा पाटील मुख्यमंत्री असताना १९७८ साली महाविद्यालयाची परवानगी मिळविण्यासाठी.
         आज जरी सांगोला विद्यामंदिराची भव्य व टुमदार वास्तु उभी असलेली दिसत असली तरी शाळा सुरु करताना सांगोला नगरपालिकेने नाममात्र भाड्याने आजतागायत शाळेसाठी दिलेली  अंबाबाईची धर्मशाळा ही इमारत तशी महत्वाचीच ठरते. सांगोला नगरपालिकेने सुरुवातीस ही धर्मशाळा देऊ केली नसती तर कदाचित शाळा सुरु झाली असती की नाही हा प्रश्नच आहे. त्यासाठी ही संस्था व शाळा नेहमीच नगरपालिकेच्या ऋणात राहून त्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त करीत आली.
         १६ सप्टेंबर १९८१ रोजी झालेल्या कै. बापूंच्या निधनानंतर १९६४ साली पं. जवाहरलाल नेहरुंच्या मृत्यूनंतर पंतप्रधान कोण हा प्रश्न जसा निर्माण झाला होता तसाच संस्थेचे अध्यक्ष कोण व कै. बापूंच्या पश्चात ही संस्था कशी चालणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु मला अत्यंत अभिमानाने व अत्यंत आदरपूर्वक सर्व संस्था सदस्यांच्या मोठ्या मनाचा यासाठी विशेष उल्लेख करावासा वाटतो. कारण अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सदस्य असतानासुध्दा कै. बापूंच्या पश्चात मातोश्री कै. बाईसाहेबांची आणि कै. बाईसाहेबांच्या मृत्यूनंतर सर्वात कनिष्ठ सभासद असताना सुध्दा अध्यक्षपदी एक मुखी माझी निवड केली. सर्व संस्था सदस्यांचे झपके कुटुंबीयावर असलेल्या प्रेमापोटी व मायेपोटी केवळ हे शक्य झाले याचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो.
         १९९८ साली या संस्थेची अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणे म्हणजे खरे तर आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यासारखेच होते. परंतु शैक्षणिक  गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून कु. श्रद्धा पतंगे या विद्यार्थीनीचा मार्च २००१ साली घेण्यात आलेल्या उच्च माध्य. परिक्षेमध्ये पुणे विभागात विज्ञान शाखेमध्ये १३ वा क्रमांक येणे पण त्याहीपेक्षा पुणे बोर्डामध्ये इंग्रजी विषयात पहिली येणे ही विशेष आनंददायी घटना होय. ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजीमध्ये कमी पडतात हा समज तिने पूर्ण चुकीचा आहे हे दाखवून दिले आहे. त्याहीपेक्षा सांगोला विद्यामंदिर प्रशालेची विद्यार्थीनी इयत्ता १२ वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात पुणे बोर्डात पहिली आली हे समजून नेहमीच शाळेच्या आसपास वावरणाच्या कै. बापूंच्या व कै. बाईसाहेबांच्या आत्म्यास सुखं वाटलेले असणार यात शंकाच नाही. 
         याशिवाय माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीमध्ये एम.टी.एस., एन.टी.एस. चित्रकला, अन्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, इत्यादीमध्ये निरनिराळ्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले घवघवीत यश व त्यामुळे संस्थेचा व शाळेचा नावलौकिक वाढविण्यास झालेली मदत तसेच सांगोल्यामध्ये सुरु केलेल्या इंग्लिश मेडीयम व प्राथमिक विद्यालय त्यासाठी उद्घाटन होत असलेली नवीन सुसज्य इमारत ,कोळे येथे सुरु केलेली इंग्लिश मेडीयम स्कूल व जुनियर कॉलेज विज्ञान शाखा , नाझरे येथे शै.वर्ष २०१८ पासून सुरु झालेली इंग्लिश मेडीयम स्कूल व जुनिअर कॉलेज विज्ञान शाखा व या सर्वांची अतिशय वेगाने होत असलेली प्रगती   या निश्चितच मनाला आनंद व समाधान देणाच्या घटना आहेत.
         कै. झपके आण्णा, कै. चव्हाण आण्णा, कै. बापूसाहेब, कै. बाईसाहेब व कै. मा. सा, माळीसर यांच्या पूर्व पुण्याईने तसेच सर्व संस्था सदस्य संस्थेच्या तीनही शाखामधील प्राचार्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आपुलकीच्या व सहकार्याच्या भावनेमुळे संस्था व सर्व शाळांची प्रगती दिवसेंदिवस होत आहे आणि अशा एका आगळ्या वेगळ्या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष पदाचा बहुमान मला मिळाला आहे. यामध्ये माझे जीवन कृतार्थ झाल्याचे समाधान मला मिळत आहे.
         संस्थेची व संस्थाचलित सर्व  शाळांची यापुढील काळातही उत्तरोत्तर प्रगती होत जाऊन ही संस्था व शाळा नावलौकिकास पात्र ठरो अशी श्री अंबिका चरणी प्रार्थना करुन मी माझे लांबत चाललेले अध्यक्षीय मनोगत संपवितो.

 

धन्यवाद!

 
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry